Publisher's Synopsis
ग्रीक तत्त्ववेत्ता सॉक्रेटिस याची जीवनमूल्ये आणि त्या मूल्यांकरिता त्याने स्वीकारलेले वीरमरण या सूत्रावर बेतलेल्या 'सूर्य पाहिलेला माणूस' या नाटकाला अनेक पदर आहेत. नाटक सुरू होते ते तीन व्यक्तींच्या संभाषणाने. या तीन व्यक्तींना, त्यांच्या संभाषणाला कुठल्याही काळाचे, ठिकाणचे संदर्भ नाहीत. त्यांच्या वरकरणी खटकेबाज अशा संवादांतून दिसायला लागतात त्या, ते ज्या प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करतात त्या प्रवृत्ती. कुणी सिनिकल तर कुणी भाबडा, कुणी बेरकी तर कुणी सरळ धारेचा. कुणी विदुषकी उपरोधातून आयुष्याची वैयर्थता प्रकट करणारा, तर कुणी आपली बाजू हिरीरीने मांडणारा... आणि आपली बाजू म्हणजे तरी कसली बाजू? त्याला राजकीय, सामाजिक असा कुठलाच संदर्भ नाही. मात्र या प्रवेशातून 'आंधळे आणि हत्ती' हे रूपक ठसवले जाते. आणि साऱ्या ज्ञानशाखा ज्या प्रश्नाकडे वळतात, त्या प्रश्नांच्या समेवर हा प्रवेश येतो. हे प्रश्न कुठले? तर 'हे सारे काय आहे?', 'या साऱ्याचा अर्थ तरी काय?', 'सत्य म्हणजे काय?', 'सत्याचे आणि आपले नाते काय?' हे आणि असे प्रश्न. सत्याबद्दलच्या या मूलभूत प्रश्नोपनिषदाला अगदी अलगद अशी एका प्रखर अशा प्रकाशस्रोताची रूपकात्मकता नकळत मिळून जाते; आणि मग जाणवते, या साऱ्या बोलणाऱ्या माणसांना संदर्भ आहे तो प्लेटोच्या 'डायलॉग्ज'मधील चिरंतन गुहांचा, त्यातील आदिम अंधारात चाचपडणाऱ्या प्रकाशरूपी सत्याच्या शोधाचा. 'सत्य म्हणजे काय? त्याचे आपले नाते काय? सत्यासारखी दाहक, अतिप्रखर गोष्ट कुणी पळवली आहे काय? अशा मालिकेतून गोष्ट सुरू होते ती सत्यापासून न चाललेल्या, 'सूर्य पाहिलेल्या माणसाची', सॉक्रेटिसची. तत्कालीन ग्रीक संस्कृतीचा इतिहास हा अतिमर्यादित लोकशाही आणि दडपशाही राजसत्ता यांच्या रस्सीखेचीचा इतिहास आहे. अतिशय मर्यादित अशा वैचा