Publisher's Synopsis
लेखिका नीरजा यांनी मानवी नातेसंबंधांचा एका मोठ्या पटलावर घेतलेला शोध म्हणजे या संग्रहातील कथा. पावसात सूर्यदर्शन होणार नाही, सूर्य शोधत येणार नाही हे माहित असूनही तो शोधण्यासाठी उत्सुक असलेली, संघर्ष करणारी, विजय मिळतो आहे अशा भ्रमात असतानाच पराजयाचे वाटेकरी होणारी आणि तरीही झगडत राहणारी माणसे नीरजा यांच्या या संग्रहात भेटतात. या कथसनग्रहतले सगळे विषय 'माणूस आणि त्याचे नातेसंबंध' या आशय्सुत्राभोवती फिरत असले तरी ते वेगळे आहेत; एका वेगळ्या परिघातले आहेत हे जाणवते. त्यामुळेच कथेचा प्रारंभ वाचत असताना वाचकांच्या मनात ज्या शक्यता येतात (पारंपरिक कथांच्या वाचनाने) त्यांना छेद देऊन वाचकांना वेगळ्या भावविश्वात नेणाऱ्या या कथा आहेत. दीर्घकथेत कथाकाराला असणारे कथा फुलवण्याचे, वातावरणनिर्मितीचे स्वातंत्र्य त्या पुरेपूर घेतात. त्यामुळे केवळ ती व्यक्तिरेखाच नव्हे तर ज्या परिसरामुळे त्या व्यक्तीची अशी मानसिकता बनली आहे; तो परिसर आणि ते वातावरणही त्या कथेचा एक अविभाज्य भाग बनून जाते. स्त्रियांच्या वाट्याला येणारे दुःखभोग त्यांनी ज्या ताकदीने मांडले आहेत तेवढ्याच ताकदीने पुरुषांच्या दुःखाचे सूक्ष्म पदरही त्यांनी उलगडून दाखवले आहेत. त्यामुळे या कथा केवळ स्त्रीवादी राहत नाहीत. एकूण मानवी नातेसंबंधांचा खोलवर जाऊन घेतलेला शोध हे या कथासंग्रहाचे बलस्थान आहे.