Publisher's Synopsis
'संध्याकाळच्या कविता'मध्ये अनंत संध्यावेळा एकवटल्या आहेत. सगळ्या वेळांची मिळूनच झाली आहे एक दीर्घ संध्याकाळ. प्रकाशाचा मृत्यू होत असताना सृष्टीवर दाटून आलेले गहन आणि गहिरे औदासिन्य, दूर दूर पसरत गेलेली जडता, स्तब्धता आणि निःशब्द एकटेपणा, या एकाकीपणात जाणवणारे, चिरंतन सोबत करणारे गूढ पण उदात्त दुःख आणि अशा दुःखातच पटणारी त्या अद्भुत शक्तीच्या अस्तित्वाची ओळख. त्या अद्भुत शक्तीचे अवतरण संध्याकाळी साऱ्या सृष्टीमध्ये होते आणि अशाच वेळी ग्रेसचा आत्मा जागा होऊन गाऊ लागतो. तिथे बाहेर आणि इथे आत एक विलक्षण समाधीअवस्था निर्माण होते. बाहेरची उदास गूढ चित्रे आतमधला अर्थ खेचून घेतात एका उत्कट, अधीर प्रतीक्षेचाच भाग बनतात. संध्याकाळच्या धूसर वातावरणात ग्रेसचे दुःख फिरुन फिरुन जन्म घेते. संध्याकाळीच ही वेदना पुनःपुन्हा जागी होते कारण याच वेळी फक्त याच वेळी तो स्वतःतून वाहणाऱ्या प्रवाहाच्या उगमापर्यंत जाऊ शकतो. प्रत्येक अनुभूतीतून, प्रत्येक आठवणीतून, अस्तित्वाच्या प्रत्येक कणाकणातून तिथे पोहचण्याची तळमळ एक आर्त परंतु मूक हाक मारते ती फक्त संध्याकाळीच. म्हणूनच या संध्याकाळच्या कविता.